विवेकानंद पोलीस चौकी पोलिसांकडून दोघांना अटक अटक
वाढता गुन्हेगारीचा आलेख : लातूरकरांच्या मनात भीतीचे वातावरण,
प्रशासनाकडून वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांतून मागणी
लातूर | प्रतिनिधी
लातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन तरुणांनी मिळून एका तरुणावर चाकू व कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात प्रज्वल उर्फ गोल्या संजय मस्के (रा.आनंदनगर, लातूर) याचा रक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला. भरवस्तीत घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून आरोपी गणेश गायकवाड व भीमा सूर्यवंशी यांनी प्रज्वल मस्के याला अडवून एकाने चाकूने तर दुसऱ्याने कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात प्रज्वल मस्के खाली कोसळला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी अवस्थेतील तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या व पोलिस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी प्रज्वल मस्के याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आतिष बाबासाहेब मरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेऊन काही तासांतच गणेश गायकवाड व भीमा सूर्यवंशी या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेली चाकू व कोयता जप्त केला असून, दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत प्रज्वल मस्के हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या लातूर जिल्हा विद्यार्थी आघाडीचा सचिव असल्याची माहिती असून, या घटनेचे राजकीय पडसादही उमटले आहेत. घटनेनंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव तसेच महापालिकेतील काँग्रेस गटनेते विजय साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले.
सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, हत्येमागील नेमका हेतू, पूर्ववैमनस्य आणि इतर सहभागींचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे लातूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला
आहे.
