बेकायदेशीर शस्त्रसाठा उघड; दोन गावठी कट्टे व ११ काडतुसे जप्त
जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धडाकेबाज कारवाई करत दोन गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) व 11 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून तिसरा आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
दि. 30 डिसेंबर रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विक्की वीर (रा. काद्राबाद, जालना) हा इसम गावठी पिस्टल बाळगत आहे. ही माहिती त्यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या आदेशाने डीबी पथकाने कारवाई सुरू केली.
पोलीस पथकाने अलंकार टॉकीज परिसरातून दुपारी 1.30 वाजता विक्की वीर यास ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक चौकशीत सदर गावठी कट्टा हा शिवम राजपूत (रा. राजपूतवाडी, ता. जि. जालना) याचा असून तो सध्या विक्रम कुलथे (वय 30, रा. राजपूतवाडी) याच्याकडे ठेवलेला असल्याची माहिती त्याने दिली.
त्यानंतर डीबी पथकाने दुपारी 2.30 वाजता मयुरी पार्क, समनगाव रोड परिसरातून विक्रम कुलथे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे असल्याची कबुली दिली. त्यापैकी एक कट्टा व पाच जिवंत काडतुसे ही शिवम राजपूत याची असल्याचेही त्याने सांगितले.
विक्रम कुलथे याच्या सांगण्यावरून डीबी पथकाने दुपारी 3.50 वाजता संबंधित ठिकाणी जाऊन जमिनीत पुरून ठेवलेले दोन गावठी कट्टे व 11 जिवंत काडतुसे हस्तगत केली.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोवाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी व पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
