संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये १ लाख ४० हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अप्सरा मोहम्मद शेख (वय ५९, रा. घारगाव) या ७जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून आपले राहते घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली आणि लाकडी कपाटाचे ड्रॉवर फोडून त्यातील मौल्यवान ऐवज लंपास केला.या घरफोडीमध्ये चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १५ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि ५० हजार रुपये किमतीचे १ तोळा वजनाचे सोन्याचे काळे मणी असलेले मिनी गंठण असा एकूण ७५ हजार रुपयांचे दागिने चोरले. तसेच, कपाटात ठेवलेली १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
१७ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादी घरी परतल्या असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१ (४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे करत आहेत.
