जालना (प्रतिनिधी): जालना महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भास्कर आबा दानवे यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर छ.शिवाजीनगर म्हाडा कॉलनी परिसरात त्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला. कॉलनीतील नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी दानवे यांचे औक्षण करत फुलांची उधळण व शुभेच्छांचा वर्षाव केला. या वेळी संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला, भास्कर आबा दानवे यांच्यासोबत नवनिर्वाचित नगरसेवक सुशीलाताई दानवे, कल्याण भदनेकर, ज्योती सले, पदमा मानधनी यांची उपस्थिती होती.
सत्कारप्रसंगी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. महिलांनी औक्षण करून “प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत” असा विश्वास व्यक्त केला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा आनंद साजरा केला.
या वेळी बोलताना भास्कर आबा दानवे म्हणाले की, “नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, तो मी कधीही तुटू देणार नाही. विकास थांबणार नाही. प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्ट्रीटलाईट, उद्याने तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा या सर्व बाबींना प्राधान्य दिले जाईल.”ते पुढे म्हणाले की, “प्रभागातील रखडलेली विकासकामे मार्गी लावली जातील. मूलभूत सुविधांबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाईल. मला निवडून दिल्याबद्दल मी सर्व नागरिकांचा मनापासून आभारी आहे. हा विजय माझा नसून प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आहे.”
या कार्यक्रमास छ.शिवाजीनगर म्हाडा कॉलनीतील नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जल्लोष, घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या शुभेच्छांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
