या संपूर्ण षड्यंत्रास काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, कल्याण दळे, अब्दुल रशीद पहलवान, अतीक खान तसेच प्रदेश पदाधिकारी सतीश गणेश पाटील हे थेट जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विनोदभैय्या यादव यांनी केला.
सक्षम उमेदवारांना संपवण्याचा डाव
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार निवडताना जाणीवपूर्वक सक्षम उमेदवारांना डावलण्यात आले. उमेदवारांना पक्षाकडून कोणतीही मदत न देता उलट त्रास देण्यात आला. अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेसमोर जाणूनबुजून कमकुवत उमेदवार देऊन काँग्रेसचीच शिवसेना ‘बी टीम’ म्हणून काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
प्रभाग क्रमांक ०२ ब मध्ये उघड कारस्थान
प्रभाग क्रमांक ०२ ब मधील काँग्रेस उमेदवार जागृती बलीराम यादव यांनी सांगितले की, त्यांचे नाव खासदार डॉ. कल्याण काळे यांनी तयार केलेल्या अंतिम उमेदवार यादीत होते. मात्र मेरीट हॉटेलमध्ये अचानक यादी बदलण्यात आली. हा बदल कोणी, कधी व का केला याचे उत्तर आजही मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बी-फॉर्मसाठी टाळाटाळ, वेळकाढूपणा
उमेदवारी अर्जासोबत बी-फॉर्म जोडण्यासाठी वेळेआधी प्रयत्न करूनही जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत वेळ वाया घालवली. अखेर विनोद यादव यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात हात पकडून नेत गर्दीतून मार्ग काढत कसाबसा बी-फॉर्म जोडल्याचा थरारक प्रकार घडला.
छाननीत नाव बदलण्याचा प्रयत्न
छाननीच्या दिवशी प्रदेश पदाधिकारी सतीश गणेश पाटील यांच्या नावाने आलेल्या पत्रात जागृती यादव यांचे नाव वगळून दुसऱ्या उमेदवाराचे नाव असल्याचे सांगण्यात आले. यावर सुनावणी झाली. अखेर संध्याकाळी आठ वाजता “पहिला अर्ज दाखल झाल्याने जागृती यादव यांचा अर्ज वैध” असा निर्णय देण्यात आला.
पैसे वाटून विरोध उभा केल्याचा आरोप
यानंतर अपक्ष उमेदवार उभे करून त्यांना आर्थिक बळ देण्यात आले. कधी काँग्रेस, कधी कमळ, तर कधी शिवसेना चालवा असे सांगत खुलेआम पैसे वाटप करून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सारा प्रकार काँग्रेसमधीलच शिवसेना ‘बी टीम’ने रचल्याचा आरोप विनोदभैय्या यादव यांनी केला.
काँग्रेसला जय श्रीराम; भाजपात प्रवेश लवकरच
या साऱ्या गद्दारी, फसवणूक आणि कारस्थानांमुळे काँग्रेस पक्षावरचा विश्वास संपल्याचे सांगत विनोदभैय्या यादव व जागृती बलीराम यादव यांनी काँग्रेस पक्षाला जय श्रीराम केला. लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला विनोदभैय्या यादव, जागृती बलीराम यादव, सौ. सुनंदा चरपटे, अभयकुमार यादव यांच्यासह असंख्य संतप्त कार्यकर्ते उपस्थित होते.
