2 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
महाराष्ट्र क्राईम न्युज वृत्तसेवा
शिरुर (प्रतिनिधी) ः शिरूर तालुक्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत महत्त्वाची व धक्कादायक कारवाई केली आहे. बाबुराव नगर, शिरोळे परिसरात एमडी (मॅफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर राबविण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 1 किलो 52 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 2 कोटी 10 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहादा रियाज शेख (वय 41, रा. शिरूर) यास अटक करण्यात आली आहे.दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी रात्री, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सदर माहिती तात्काळ शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळविण्यात आली. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर एनडीपीएस कायदा कलम 42 अन्वये आवश्यक परवानगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर उपविभाग) यांच्याकडून दूरध्वनीद्वारे घेण्यात आली. यानंतर पंच, छायाचित्रकार, वजन काटा व पंचनाम्यासाठी आवश्यक साहित्य
बोलावून घेण्यात आले. पंच म्हणून नितीन बाद्य गरदाळे (वय 21) व रामदास गोरोबा अरदवाड (वय 38) यांची उपस्थिती निश्चित करण्यात आली.रात्री सुमारे 12.15 वाजण्याच्या सुमारास बाबुराव नगर येथील मोकळ्या मैदानाजवळ सापळा रचण्यात आला. त्या वेळी काळ्या रंगाच्या हिरो होंडा पॅशन दुचाकीवरून आलेल्या संशयितास थांबविण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शहादा रियाज शेख असे सांगितले. एनडीपीएस कायदा कलम 50 अंतर्गत त्याचे हक्क समजावून सांगून पंचांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली असता त्याच्याकडील बॅगमध्ये एमडी (मॅफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला.जप्त एमडीचे वजन 1 किलो 52 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे 2 कोटी 10 लाख 40 हजार रुपये आहे. यासह आरोपीकडील दुचाकी व मोबाईल फोन असा एकूण 2 कोटी 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व मुद्देमाल पंचनाम्यानुसार सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 22, 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील अमली पदार्थ विक्रीच्या साखळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
