प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी श्री पुजीता गोविंद रेड्डी वय- 25 वर्षे रा. 3-8-381 जयनगर, बोलमानडोंडील रायचुर, कर्नाटक हे त्यांचे कुटुंबासह दिनांक 24/12/2025 रोजी रात्री 08/00 वा.चे सुमारास शिर्डी साईबाब मंदिर येथे दर्शन घेवुन शिर्डी साईबाबा संस्थान भक्तीनिवास 500 रुम येथे गेटवर बॅग ठेवलेली असतांना कोणीतरी अज्ञात आरोपींनी बॅगेतील मोबाईल, भारतीय व अमेरिकन चलन , आधार कार्ड, 02 क्रेडीट कार्ड, असा एकुण 60,000/- रुपये कि.चा मुद्देमाल चोरुन नेलेली आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 1040/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शिर्डी परिसरामध्ये बॅग चोरीच्या वारंवार घटना होत असल्याने श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास बॅग चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
पथकाने अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करुन सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 07/01/2026 रोजी पथकास गोपनिय माहिती व व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदरचा गुन्हा हा इसम नामे 1) आशिष मंगलम व विठ्ठल शेलार अशांनी केला असल्याची व ते श्रीरामपुर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर माहितीचे आधारे तात्काळ अशोकनगर, श्रीरामपुर परिसरामध्ये जावुन त्यांचा शोध घेत असतांना दोन संशयीत इसम मिळुन आले. सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) आशिष रविंद्र मंगलम वय 20 वर्षे, रा. अशोकनगर, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, 2) विठ्ठल संजय शेलार वय 20 वर्षे, रा. अशोकनगर, निपाणीवडगांव, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांचे ताब्यातुन 50,000/- रुपये किमतीचा एक आयफोन, 10,000/- रुपये त्यामध्ये विदेशी चलनाच्या नोटा असा एकुण 60,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील इसमांना मुद्देमालासह शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
