मनरेगा अंतर्गत कुटुंबांना समृद्ध करण्यासाठी एकजुटीने कामे करूया – अप्पर मुख्य सचिव श्री. नंदकुमार

0

सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजना जबाबदारी अमलबजावणी करण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन

औरंगाबाद दि. २६ मे, २०२३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजननेअंतर्गत राज्यात सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजना राबवून ग्रामीण कुटुंब आणि ग्राम समृद्ध करण्याचा ध्यास शासनाने घेतला आहे. क्षेत्रीय स्तरावर सदर योजनेची अंमलबजावणी करतांना विकास सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका आणि जबाबदारी आहे. त्यानुसार सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजना योग्य प्रकारे राबविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन वंदे मातरम सभागृह, किले अर्क परिसर, औरंगाबाद येथे करण्यात आले होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना पाहिजे ते काम देऊन कुटुंबांना समृद्ध करण्यासाठी एकजुटीने कामे करूया असे प्रतिपादन रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी यावेळी केले. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजना अभियान स्वरूप राबवून ग्राम समृद्धीच्या वाटचालीचे भागीदारी व्हावे, असे आवाहन चर्चा सत्रात उपस्थित अधिकाऱ्यांना केले. रोहयो विभागाद्वारे दि. १४ डिसेंबर, २०२२ च्या निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच योजनेअंतर्गत झालेल्या यशोगाथांचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानुसार सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजना योग्य प्रकारे राबविण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मनरेगाच्या सुधारित दृष्टिकोन नुसार प्रत्येक कुटुंब हे सुविधा संपन्न झाले पाहिजे आणि ते करताना कशा पद्धतीने कार्य करावे लागेल तसेच सुविधापतीचे टप्पे सर्वांना समजवून सांगितले. राज्यातील गरिबी कशी कमी करता येईल व हे करण्यासाठी मनरेगा ही एकमेव योजना कशी ठरू शकते याबद्दल सचिवांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व जिल्हा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपजिल्हाधिकारी (रोहयो), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा)/पंचायत, गट विकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी उपस्थित होते.