‘ब्रेक द चेन’ अतंर्गतचे निर्बध शिथिल दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आदेश

0

जळगाव, (जिमाका) दि. 3 – शासनाने राज्यातील 11 जिल्हे वगळता इतर अन्य जिल्ह्यांमध्ये कोविड -19 विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट आढळून येत असल्याने लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत निर्देश दिले असून यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसह इतर सर्व दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री 8 आणि शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा  देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
संचारबंदी – फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही व्यक्तीस केवळ Medical Emergency वगळता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यत मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील. तसेच संचारबंदी कालावधीत आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, अग्निशमन विभाग, एमएसईबी, महानगरपालिका व नगरपालिका कार्यालये व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना ये-जा करण्यास सुट राहील. तसेच सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील. जमावबंदी – मुंबई पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे जमावबंदी आदेश लागू राहतील. जळगाव जिल्ह्याकरीता सुट देण्यात आलेल्या बाबींचा तपशिल अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने/आस्थापना दररोज रात्री 8.00 वाजेपर्यत सुरु राहतील. तथापी रविवारी बंद राहतील. मेडीकल दुकाने/वैद्यकीय सेवा वगळून सर्व Essential व Non Esscntial प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी/काऊंटर समोर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. तसेच पारदर्शक प्लास्टीक शिट, Face Shield यांचा वापर करावा. सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाणघेवाण करता येईल एवढीचे मोकळी जागा ठेवण्यात यावी.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने/आस्थापना/शॉपिंग मॉल (Non-Essential) दररोज रात्री 8.00 वाजेपावेतो व शनिवारी दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरु राहतील तसेच रविवारी सर्व दुकाने/आस्थापना/ मॉल बंद राहतील. थिएटर्स/नाट्यगृह/मल्टीप्लेक्स (स्वतंत्र व मॉलमध्ये असणारे देखील) सिंगल स्क्रिन बंद राहील. हॉटेल/रेस्टॉरंट/बार 50% ग्राहक क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार केवळ दुपारी 4.00 वाजेपर्यंत Dining करीता सुरु राहतील. तसेच दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा/टेकअवे/घरपोच सुविधा देता येतील. तसेच शनिवार व रविवार Dining पूर्णपणे बंद राहील. केवळ पार्सल सुविधा/टेकअवे/घरपोच सुविधा देता येतील. सार्वजनिक ठिकाणे/खुले मैदाने/जॉगिंग/ सायकलींग व मॉर्निंग वॉक सुरु राहील. खाजगी कार्यालये 100% कर्मचारी उपस्थिती सुरु राहील. शासकीय कार्यालयांची नियमित वेळेसह 100% कर्मचारी उपस्थितीत सुरु राहील.  क्रिडा प्रकार व शुटींग व तत्सम स्पर्धा (Outdoor Sports Only) सुरु राहतील. सामाजिक/सांस्कृतिक/ राजकीय/मनोरंजनात्मक कार्यक्रम 2 तासाच्या आत सोमवार ते शुक्रवार 200 व्यक्तींच्या मर्यादेत रात्री 8 वाजेपर्यंत करता येतील. मोर्चे, निदर्शने, रॅली बंद राहील. केवळ 5 लोकांच्या मर्यादेत निवेदन देता येईल. लग्न  समारंभ एका वेळेस केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत रात्री 8 वाजेपर्यंत करता येईल. अंत्यविधी केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत करता येईल. धार्मिक स्थळे बंद राहतील. सर्व प्रकारच्या बैठका/ग्रामपंचायत/को-ऑपरेटीव्ह निवडणूक 50 %  क्षमतेसह सुरु राहीतल. सर्व प्रकारचे बांधकामे रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील.
कृषी संबंधित कामे, ई कॉमर्स सुविधा रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. जिम/सलून/ब्युटीपार्लर/स्पा सेंटर/ वेलनेस सेंटर/योगा सेंटर सोमवार ते शुक्रवार 50% ग्राहक क्षमतेसह केवळ प्रि-बुकींग पध्दतीने 8 वाजेपर्यंत व शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यत सुरु राहतील. एसीचा वापर करण्यास मनाई राहील तथापि, रविवारी बंद राहतील. माल वाहतूक व्यवस्था पुर्ण क्षमतेसहसुरु राहील. सार्वजनिक वाहतूक 100 % क्षमतेसह सुरु राहील. उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. तसेच सर्व प्रवासी मास्कचा वापर करतील याची जबाबदारी संबंधित वाहन चालक व वाहक यांची राहील. निर्यात करणारे उद्योग (लघु, सुक्ष्म, मध्यम सहित) कंपन्या/आस्थापना घटक पूर्ण क्षमतेसह सुरु राहतील. तथापि, कामगार/मजूर यांची वाहतूक करणारी वाहने स्वतंत्र राहतील व त्यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती प्रक्रिया करणारे घटक/आस्थापना पूर्ण क्षमतेसह सुरु राहील. अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती, निर्यात, प्रक्रिया वगळता अन्य प्रकारच्या सर्व कंपन्या/ औद्योगिक आस्थापना, सर्व निर्मिती करणारे घटक, आस्थापना/सर्व निर्यात करणारे घटक, आस्थापना पूर्ण क्षमतेसह सुरु राहतील. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग क्लासेस सुरु राहतील. मात्र राज्य शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जाहिर केलेले निर्देश लागू राहतील, वरीलप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील काही प्रमाणात निर्बध लागू करण्यात आलेले असून नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटाईजरचा वापर करणे, डिस्टन्सींगचे पालन करणे व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावली यांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील. तथापि, विनामास्क फिरणे, गर्दी करणे (सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे) व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे या बाबींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर रक्कम रुपये 500/- प्रमाणे दंडाची आकारणी करण्याबाबतची कारवाई संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी. या आदेशाचे उल्लघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.