अटल बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले; लष्करासाठी हा बोगदा वरदान ठरणार

0

मुंबई : – जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे दि.०३ ऑक्टोबर रोजी मा पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. हिमाचल प्रदेशात हा जगातला सर्वात मोठा महामार्ग बोगदा आहे. ज्याचं नाव आहे अटल टनेल. माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांचे नाव या बोगद्याला दिले गेले आहे. दरम्यान, रोहंताग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वत: वाजपेयी यांनी ३ जून २००० साली केली होती. तो आता वाहतुकीसाठी तयार झाला. महत्त्वाचे म्हणजे भारत-चीनदरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे.

( काय आहेत या बोगद्याची वैशिष्ट्ये )

हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ हा बोगदा आज लोकार्पण करण्यात आले.  पीरपंजाल डोंगररांगांना भेदून ३,३०० कोटी रुपये खर्चून हा बोगदा बनवण्यात आला आहे. हा बोगदा जगातील सर्वाधिक १०,०४० फूट उंचीवर बनवण्यात आला आहे.  या बोगद्यामुळे चीनला लागून असलेल्या लडाख आणि पाकिस्तानला लागून असलेल्या कारगिलपर्यंत भारतीय सैन्याला सहज पोहोचता येणार आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचं अंतर ४६ किमीने कमी होणार आहे. त्यामुळे केवळ दीड तासात मनाली ते केलांगपर्यंत पोहोचता येणार आहे. या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर अंतरावर टेलिफोनची सुविधा असेल. ६० मीटरवर हायड्रेंट, ५०० मीटरवर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रत्येक १ किमीवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. प्रत्येक त्याचबरोबर २५० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.