लोकशाही मध्ये तुमचं मत अमूल्य आहे, मतदानाचा हक्क बजावावा – अनिकेत पाटील

0

जळगाव दि. 4:- येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समाजात विशेषतः युवावर्गात मतदान जनजागृती होण्याच्यादृष्टीने जिल्हा स्वीप कमिटीद्वारा नवमतदारांना आवाहन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.अनिकेत पाटील यांनी लोकशाही मध्ये तुमचं मत अमूल्य आहे. तो हक्क बजवावा. तसेच विकसित राष्ट्र निर्मितीसाठी मतदान किती आवश्यक आहे हे स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मतदान शपथ दिली. श्रीमती.अश्विनी गायकवाड (सहाय्यक आयुक्त जळगाव मनपा तथा तालुका स्वीप नोडल अधिकारी) यांनी युवावर्गाची भूमिका निर्णायक असून राष्ट्राच्या पर्यायाने आपल्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी प्राचार्य डॉ.एस. एन.भारंबे यांनी देखील मतदान किती आवश्यक आहे हे विषद करताना विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. सहाय्यक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी डॉ.अतुल इंगळे यांनी मतदानाचा दिवस हा सुटीचा दिवस न मानता देशाप्रती कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांच्या शुभहस्ते श्री.अनिकेत पाटील व श्रीमती.अश्विनी गायकवाड यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रा.सुरेखा पालवे (संचालक वाणिज्य विद्याशाखा मू.जे.स्वायत्त महाविद्यालय) यांच्या हस्ते दोन्ही सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी डॉ.अतुल इंगळे,प्रा.राहुल वराडे व श्री.प्रकाश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी बारी तर आभार प्रदर्शन डॉ.अब्दुल कादिर आरसीवाला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य शाखेच्या सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.