रस्ता सुरक्षेबाबात मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन; नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम – किरण बिडकर

0

नंदुरबार, दि. 15 (जिमाका वृत्त) – रस्ता सुरक्षेबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना वाहतुक नियम, चिन्हे याबाबत माहीती देण्यासाठी नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. नंदुरबार तालुक्यातील श्री. आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय (विखरण), नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (खोंडामळी), कृ. दा. गावित शैक्षणिक संकुल (कोरीट) येथे नुकतेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. रस्ते अपघात ही भारतातील गंभीर समस्या असून रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्युमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक असून दरवर्षी देशात सुमारे पाच लाख अपघात होतात व त्यात सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे वाहन चालविताना, रस्त्याचा वापर करताना कशी काळजी घ्यावी यासाठी या मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रस्ता सुरक्षाबाबत रस्त्यावरुन चालताना घ्यावयाची काळजी, सायकल चालविताना, बसमधून प्रवास करताना, चौक पार करताना घ्यावयाची काळजी तसेच हेल्मेटचे फायदे, सीटबेल्टचे फायदे, घाटात वाहन चालविताना, ओव्हरटेक करताना, वाहन मागे घेताना, रात्री वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता इत्यादी विषयांवर सहायक मोटार वाहन निरीक्षक पवन धनगर, धोंडीबा आव्हाड व प्रविण रहाणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शनपर ‘वाहतुकीची पाठशाळा’ ही पुस्तिका व वाहतूक चिन्हांची पत्रके यांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. आप्पासो. देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंखे तसेच डी. बी. भारती, के. पी. देवरे, एम. जी. नेरकर यांनी परिश्रम घेतले.